चिपळूणातील पंचलिंगे
 
गौतमेश्वर मंदिर
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले दुर्मिळ शिवनादाची प्रचिती देणारे शहरातील एकमेव श्री गौतमेश्वर मंदिर हे चिपळूणचे धार्मिक भूषण आहे. या स्वयंभू शिवालयाची बांधणी पांडवांनी केल्याचे जाणकार सांगतात.

पूर्वीच्या काळी मंदिरासमोर सुयर्यकुंड नावाचा तलावा होता. सद्यस्थितीत या तालावावर साने गुरूजी उद्यान उभे आहे. या तलावाच्या काठावरील दाट वाढलेल्या शेतात एका शेतक-यास नांगरणी करतांना जमिनीत ही शिवपिंड आढळली. गवतात सापली म्हणून गौतमेश्वर हे नाव पडले. शिवकालात अनेक शिवालयांमध्ये सेवेस (लिंगायत जंगम) वीरशैव समाजाची नेमणूक केली. त्यापैकी हे एक मंदिर असावे. वरवडेकर घराण्यास पूर्व पारंपारिक या मंदिराची सनद दिली गेली.

मंदिराच्या सभागृहात सिध्दिविनायकाची मूर्ती आहे. गाभा-यात शिवपिंडीवर मूर्ती आहे. गाभा-यात शिवपिंडीवर श्रध्दापूर्वक जलभिषेक केल्यास शिवनाद ऐकू येतो, याची असंख्या भाविकांना प्रचिती आली आहे. शिवपिंडीच्या मागील देवळीत शेषनागधारी पितळी मुखवटा असून लगतच्या 2 न् 2 फूट लांब रूंद चौकोनी आकाराच्या काळया पाषाणावर सूर्य, चंद्र, गदा, शंख, शिवपिंड, पादुका, कुंड, जपमाळ अशी चित्रे कोरली आहेत. या मंदिराशेजारी पूर्वी प्रचंड आकाराचा पिंपळवृक्ष होता. मंदिरा शेजारी बालमारूती मंदिर आहे. महाशिवरात्रीच्या उत्सवास सुमारे 150 वर्षांची परंपरा आहे, अशी माहिती या मंदिराचे पुजारी श्री. अरविंद ऊर्फ आप्पा कृष्णलिंग वरवडेकर यांनी दिली.


वीरेश्वर मंदिर
शहराच्या मध्यवर्ती एस.टी. बस स्थानकानजीक मुंबई-गोवा महामार्गापासून जवळच प्राचीन श्रीदेव वीरेश्वर मंदिर निसर्गरम्य वातावरणात वसले आहे. इ.स. सहाव्या शतकामध्ये चालुक्य घराण्यातील दुसरा पुलकेशी राजाने चिपळूणात केलेल्या यज्ञाचे पुरोहित कृष्णस्वामी यांनी यज्ञकार्यात मिळालेल्या दक्षिणेच्या द्रव्यातून चिपळूणचे पाग भागातील कृष्णेश्वर मंदिर उभारले. पुढे कृष्णस्वामींच्या पुत्राने वीरेश्वर मंदिराची उभारणी केली. यावरून वीरेश्वर मंदिर किमान सोळाशे वर्षापूर्वीचे प्राचीन मंदिर आहे, हे सिध्द होते.

पूर्वीच्या काळी हरिजनांना मंदिर प्रवेशबंदी होती. पूज्य साने गुरूजी 1943 साली चिपळूणला आले होते. श्री. के. पु. तथा अण्णा चितळे व त्यांचे बंधू नाना चितळे उभयता यांनी आपले श्री वीरेश्वर मंदिर हरिजनांसाठी खुले करण्याची तयारी दर्शविली. परंतू त्यांच्या मातोश्री हयात असताना सदरचा निर्णय म्हणजे रूढी विरूध्द पाऊल उचलणे होते. म्हणून साने गुरूजी स्वत: चितळे बंधूंच्या निवास्थानी त्यांच्या मातोश्रींना भेटले. त्यांनी आपली मते सुधारणावादी दृष्टीकोनातून सविस्तर पटवून दिली. दिशेष म्हणजे ज्या बुजुर्ग धार्मिक महिलेने मोठया उदार मनाने परवानगी देऊन संमती दर्शविली. साने गुरूजींना त्यांनी आदराने वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि डिसेंबर 1943 मध्ये मंदिर हरिजनांसाठी खुले केले गेले. हरिजनांना मंदिर प्रवेश खुला केलेले चिपळूणातील हे पहिलेच मंदिर होय. बुरसटलेल्या रूढी-परंपरांचा पगडा डावलून सुधारणावादी क्रांतीचे श्री वीरेश्वर मंदिर साक्षीदार ठरले आहे. या मंदिराची बांधणी दगडी आहे. गोल घुमट असलेल्या गाभा-यात सुमारे दीड फुट उंच काळया पाषाणाची सुबक शिवपिंडी आहे. त्यावर फणाधारी पितळी नाग आहे. गाभा-याच्या प्रवेशद्वारात एक बाजूस श्रीगणपत्ाी मूर्ती व दुस-या बाजूस श्री हनुमान मूर्ती व एक छोटे शिवलिंग आहे. गाभा-याच्या बाहेर जार्णोध्दारित सभामंडपाचे आकर्षक बांधकाम केले आहे. सभामंडपात मुख्य प्रवेशद्वारातच मोठा नंदी व घंटा आहे. स्ामोरच दिपमाळ आहे.


गांधारेश्वर मंदिर
मुरादपूर येथे वाशिष्ठी नदीच्या तीरावर श्री जुना कालभैरव देवस्थान द्रस्ट अंतर्गत स्वयंभू श्रीक्षेत्र गांधारेश्वर हे पवित्र धार्मिक शिवालय आहे. आख्यायिकेनुसार प्राचीन काळी या ठिकाणी घनदाट अरण्य होते. तेथील गांधारी नावाच्या सुगंधी फुलांच्या वनस्पतींच्या झुडूपात एका शेतक-याची गाय पान्हा सोडून अभिषेक करायची. शेतक-यास हे दृश्य तिच्य्ाावर पाळत ठेवताना दिसले. तेथे शोध घेता स्वयंभू शिवलिंग आढळले. गांधारीच्या झुडूपात आढळले म्हणून या स्थानास गांधारेश्वर म्हटले जाऊ लागले. दुस-या आख्यायिकेनूसार पांडव अज्ञातवासात तीर्थाटन करताना या स्थानी आले. त्यांनी या शिवलिंगावर माता गांधारीचे स्मृतिप्रित्यर्थ एक रात्रीत शिवलय उभारले. म्हणूनच गांधारेश्वर हे नाव पडल्याचेही सांगतात.

हे देवस्थान जागृत व ऐतिहासिक आहे. विस्तृत सभामंडपाचे हे देवस्थान पश्चिमाभिमुख आहे. येथील शिवपिंडीवरील विशाल कलाविष्कार असलेली पंचधातूची फणाधारी नागमूर्ती चिपळूणच्या कोवळे घराण्याचे सिध्दहस्त शिल्पकार कै.श्री.राजाराम हरशेठ कोवळे यांनी स्वहस्ते घडवून मंदिरास तत्काळी दान दिली आहे. शिवपिंडी समोरील सभामंडपात काळया पाषाणात कोरलेला खुरमांडी घालून बसलेला नंदी आहे मंदिराच्या प्रशस्त आवारात आकर्षक काळया पाषाणांची बांधीव दीपमाळ आहे. मंदिर परिसरात प्राचीन पाषाण शिल्पमूर्तीही आहेत.

पाऊस वेळेत पडला नाही व दुष्काळ पडला तर श्री गांधारेश्वरचा गाभारा पाण्याने भरण्याची प्रथा आहे. नवस म्हणून हे पाणी भरून पर्जन्यराजास आवाहन केले जाते. या नवसास प्रचिती बारमाही विशेषत: दर सोमवारी भाविकांची रीघ लागते. श्रावण सोमवारी व महाशिवरात्रीला विशेष गर्दी उसळते.

श्री. गांधी रक्षा कलश समाधी स्मारक (गांधी घाट)

श्री. गांधारेश्वर मंदिराचे समोरील वाशिष्ठी नदी किना-याला नदीपात्रात उतरण्यासाठी काळया पाषाणाच्या पाय-या बांधलेल्या आहेत. त्यास गांधी घाट संबोधतात. मंदिराच्या प्रांगणात नदीकिनारी म. गांधींच्या अस्थिकलशावर आधुनिक बांधकामाची पवित्र वास्तू उभी आहे.


कृष्णेश्वर मंदिर
शहराच्या ऐतिहासिक पाग भागात श्रीदेव कृष्णेश्वराचे वैशिष्टयपूर्ण बांधणीचे मंदिर आहे. या मंदिराविषयी सतराव्या शतकातील बोरवनचे (सातारा) संत तु.का. विप्र यांच्या संत तु.का. विप्र विजय या ग्रंथात उल्लेख आढळतात. त्यांनी श्री परशुराम, श्री कृष्णेश्वर पाग, धूतपापेश्वर-राजापूर याक्षेत्री भेटी देऊन अभंग रचना केल्या. कृष्णभट नावाच्या शिवभक्तास याठिकाणी भगवंतांनी दर्शन दिले. म्हणून कृष्णभट हे नाव प्राप्त झाले. नानाभाऊ पेशवे दरबारी महादेव नावाचा शिवभक्त सेवक म्हणून होता. त्याचेकडे पाग भागाची व्यवस्था होती. त्याच्या विनंतीवरून नानाभाऊ पेशवे सरकारांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला.


रामेश्वर मंदिर
हे पुरातन जागृत देवस्थान आहे. इतिहासात या ठिकाणाला अनेक महापुरूषांनी भेटी दिल्याचा उल्लेख आहे. काही पिंपळ व वटवृक्ष आजही सावली देत उभी आहेत. तर रामेश्वर तलाव व 150 वर्षे जुनी स्मशानभूमी हे या भागाचे महत्व अधिक स्पष्ट करतात. अलिकडे हे मंदिर जीर्णोध्दारित करण्यात आले आहे. रामेश्वर तलावात छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी स्नान करून परशुराम दर्शनास गेल्याचा उल्लेख समर्थ चरित्रात आहे. या देवस्थानची सनद कै. नारायण गणलिंग वरवडेकर यांचे नावे असून ती गौतमेश्वरचे मंदिराच्या सनदीबरोबरच एकाचवेळी अंदाजे सन 1874 मध्ये दिली गेली. ब्रिटीश काळात वरवडेकर (वीरशैव लिंगायत गुरव) यांच्या पूर्वजांना वरवडे ता.जि. रत्नागिरी येथून कै. बापूकाका जोशी यांनी श्री. कृष्णेश्वर-गौतमेश्वर-रामेश्वर आदि देवस्थानचे पुजारी म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली.

 
© Chiplun Nagar Parishad. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions